Wednesday, September 19, 2012

नाद , नाद , अंतर्नाद

वाजताहेत घणघण  घणघण घंटा
सतत अविरत
इकडे तिकडे चोहिकडे
बधिर होउन जाऊदे एकदाच ....

बोथट संवेदनाना चाटू दे ईर्शेचा अग्नी
थंड पडलेल्या हातावर पडू दे तांबडा ज्वालाग्रही गोळा
जड़ झालेल्या पायाखालील जमीनच निसटू दे
निस्तेज बुब्बुळातुन आरपार बोट जाऊदेत ....

उघडया डोळ्यांनी स्वतावरच शस्त्रक्रिया होऊ देत
चिरू दे हे कुजके हृदय टराटरा
उडू दे भिकार रक्ताच्या चिळकांड्या
हातावर , पोटावर अणि लोचट जिभेवर ....

हरेक दीर्घश्वासापायी जळाव्यात धमन्या
कोंडला जावा श्वास बेचव क्षणी
शिरशिरी यावी बांडगुळाकड़े पाहताना
घडयाळाच्या काट्यामागे पळावे उर फुटेस्तोवर ......
     

No comments:

Post a Comment