Sunday, September 23, 2012

झटपट

झटपट  ....
अतोनात थकविणारी झटपट
स्वताशीच
न जाणता होतच राहणारी
उजाड़ खोली
हात पाय बांधलेले
तोंडात मोठा बोळा
जमिनीवर उताणा
कोपऱ्यातल्या मिणमिणत्या मेणबत्तीची साथ  
श्वासोच्छवासाचे मंद विराण संगीत 
मेणबत्ती संपताच येणारया  
भयानक अंधकाराची भीती
झटपट , चालूच आहे झटपट .....
कसातरी निसटण्याची
सुटन्याची .....स्वताच्याच पाशातुन
ज्योतीमधुन येणारे अखंड मुडदे  
हसताहेत ....
स्वताच्याच मूर्त शरीराकडे
ते येतच राहत आहेत
खोली हळूहळू  भरत चाललीये
जागा कमी पडत आहे ......झटापटीला
झटपट
बंद डोळ्यांची झटपट
मिटण्यासाठी
अंतरीची आस मेणबत्ति संपण्याची
इंच इंच झटपट  .............






Friday, September 21, 2012

आरसा , मी , आरसा ......

आरसे , एकूण दोन
समोरासमोर ठाकलेले
आणि मधे मी
आरसा , मी , आरसा  ....
एकच मी
पण दोन्हीकडे अनेक मी
माझ्यातला मी ,
दुसऱ्या मी  ला पाहणारा
सारेच अनोळखी एकमेका .....
फ़ौज उभी माझी
माझ्यासमोरच
दोन्ही बाजूस
सज्ज
हसणारी , अक्राळविक्राळ ....
लगाम माझ्याच हाती
पण बेकाबू सारे अनंत
सावरताना , उमजताना एकेकाला
हरवत गेलो एकेकात ....
खोल खोल
ठिबका झालो
पाऱ्याशी मिसळलो ....
आरशाशी भांडलो , दोन्ही
आदळलो  , आपटलो
तुकडे झालो
एक ना दोन
तुकडेच तुकडे
चोहिकडे
एक्मेकापासून अलगविलग  ........

क्षणात माझ्यात मी परतलो
तुकडा तुकडा सांधत बसलो .......




तरंग


पाण्यावर उठणारे तरंग
वर्तुळाकार , गोल गोल
सतत मोठे होत जाणारे
विरत जाणारे हळूहळू .....

मनातले तरंग
चक्राकार , वाकडेतिकडे
बेछुट फिरणारे
रुतत जाणारे  हळूहळू  .......


Wednesday, September 19, 2012

श्वास


श्वास रोखलेला
आतल्या आत
आतड्यापर्यंत
हृदयाची धडधड सतत वृद्धिंगत

चोरटी झुलूक
स्पर्शून जाते अलगद
जातात क्षण विरून सारे
हाती उरतो कोरडा उसासा

डोळ्यातून , जमीनीतुन आरपार जाणारी नजर
आकाशातील पोकळी शोधणारी नजर
सिगारेटच्या धुरामागे स्वतालाच हरविणारी नजर
काळ्या  ठिबक्याला सतत मोठी करणारी नजर ..........


ता . क  : कविता  वाचून काहीतरी कालवाकालव व्हायला हवी, तरच काही अर्थ आहे . वांझोटया ओळी म्हणजे काळा हिरा .

तो


तो तसाच काठाशी बसणारा
मी सतत गटान्गल्या खाणारा

तो संथ विरहे
मी नुसताच फडफडणारा

तो क्षणिक गारवा
मी एक तिरीप

तो एक सुंदर लकेर
मी रुक्ष घरघर

तो निवांत तळ
मी कस्तूरीमृग ...

नाद , नाद , अंतर्नाद

वाजताहेत घणघण  घणघण घंटा
सतत अविरत
इकडे तिकडे चोहिकडे
बधिर होउन जाऊदे एकदाच ....

बोथट संवेदनाना चाटू दे ईर्शेचा अग्नी
थंड पडलेल्या हातावर पडू दे तांबडा ज्वालाग्रही गोळा
जड़ झालेल्या पायाखालील जमीनच निसटू दे
निस्तेज बुब्बुळातुन आरपार बोट जाऊदेत ....

उघडया डोळ्यांनी स्वतावरच शस्त्रक्रिया होऊ देत
चिरू दे हे कुजके हृदय टराटरा
उडू दे भिकार रक्ताच्या चिळकांड्या
हातावर , पोटावर अणि लोचट जिभेवर ....

हरेक दीर्घश्वासापायी जळाव्यात धमन्या
कोंडला जावा श्वास बेचव क्षणी
शिरशिरी यावी बांडगुळाकड़े पाहताना
घडयाळाच्या काट्यामागे पळावे उर फुटेस्तोवर ......
     

Monday, September 17, 2012

तो

तो ..... मला क्वचितच भेटतो
हातात हात मिळवितो
हसतो ...बोलतो
प्रेरित वाटतो

तो..... फारच थोडा वेळ थांबतो
अवचित सर जणू
वळवाच्या पावसासारखा बरसून जातो
न सुकणारा ओलावा देवून

तो ....फारच दूरचा वाटे
अनोळखी अनेकदा
साचलेले गढूळ पाणी
आभासी प्रतिबिंब

तो ....असतो सावलीसारखा
मध्यान्हीचा सूर्य न पाहिलेला ......

Friday, September 7, 2012

Nachiketa

It's better to be on the wrong side of the evolutionary curve, whilst pertaining other side of the revolutionary one!